पुण्यातील नोकरीच्या संधी सोडून वंचित मुलांच्या शिक्षणासाठी यवतमाळमध्ये युवाजोडप्याचा अभिनव बालनगरी उपक्रम

पुण्यातील नोकरीच्या संधी सोडून वंचित मुलांच्या शिक्षणासाठी यवतमाळमध्ये युवाजोडप्याचा अभिनव बालनगरी उपक्रम

प्रणाली आणि धम्मानंद हे युवाजोडपं सध्या समाजाच्या मुख्य प्रवाहापासून लांब असणाऱ्या समुहातील मुलांच्या शिक्षणासाठी काम करत आहेत. या दोघांनीही नोकरी सोडून आयुष्यभर वंचित मुलांच्या शिक्षणावर काम करण्याचा निर्धार केलाय. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ते थेट यवतमाळमध्ये गेले आहेत. यवतमाळ जिल्हयातील काही गावांमध्ये त्यांनी बालशिक्षणावर काम करायला सुरुवात केली आहे.

धम्मानंद गेली 6 वर्षांपासून तर प्रणाली 2 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. या अगोदर त्यांनी युनिसेफच्या प्रकल्पात काम करत या सर्व कामाचा तंत्रशुद्ध अनुभवही घेतलाय.  मागील 2 महिन्यांपासून ते यवतमाळमधील धनगर आणि आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी काम करत आहेत. या समाजात शेतमजुरी आणि मेंढ्या पाळणं हेच कामाचं स्वरुप असल्याने संपूर्ण कुटुंब मेंढ्या चारण्यासाठी आणि शेती कामासाठी कायम वेगवेगळ्या ठिकाणी पाल टाकून राहतं. हे ज्या गावात राहतात तिथून शाळा 2-3 किलोमीटर अंतरावर असते. सध्या ते ज्या गावात आहेत तेथे रस्तेही चांगले नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागते. सध्या हे जोडपं 3 ते 10 वर्षांच्या मुलांसोबत काम करत आहे. या लहान वयातील मुलांना पालक त्यांच्या कामासाठी घरी ठेऊन जाऊ शकत नाही. कारण मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उदभवतो. त्यामूळे ही मुलं पालकांसोबत शेतीवर आणि मेंढ्या चारायला दिवसभर जातात.